रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

तोचि साधु ओळखावा

तोचि साधु ओळखावा

एडिसन, मार्कोनी, स्टीव्ह जॉब्ज, अशोक गाडगीळ..!!

वैज्ञानिक दिग्गजांच्या यादीत मराठी नाव! चुकून पडलंय का?

ती यादी ‘गुरु, शुक्र, व्याध, ध्रुव’ या यादीइतकीच बिनचूक आणि लखलखीत आहे.




अमेरिकेचा National Inventors Hall of Fame हा वैज्ञानिक रत्नांचा दरबार आहे.  आपल्या व्यापक संशोधनाने उभ्या जगावर प्रगतीचा ठसा उमटवणाऱ्या, एडिसनसारख्या एकूण पाचशे मातब्बरांचाच आजवर त्या दरबारात समावेश झाला आहे. त्या तालेवारांच्या खाशा पंगतीत यंदा एका मराठी माणसासाठी सन्मानाचं पान मांडलं गेलं.

कोण आहेत हे अशोक गाडगीळ?

ते एक संशोधक आहेत. जगद्‌विख्यात लॉरेन्स बर्कली नॅशनल लॅबोरेटरीच्या Environmental Energy Technology विभागाचे ते प्रमुख आहेत. पण त्यांची खरी ओळख करून घ्यायला सुदानमधल्या रंजल्यागांजल्या विस्थापितांच्या छावण्यांत जायला हवं. आर्सेनिकची विषबाधा झालेल्या बांगलादेशींच्या गावात पोचायला हवं. सुनामीच्या प्रलयात पिण्याचं पाणी शोधणाऱ्या गरिबांना भेटायला हवं. पंचमहाभूतांना कल्पकतेने माणसाळवून त्यांना गरिबांसाठी कामाला लावणाऱ्या डॉ.अशोक गाडगीळ नावाच्या अवलियाची महती तिथेच खरी जाणून घेता येईल.

बाळाचे पाय पाळण्यात

डॉ.गाडगीळांना प्रथम ओळखलं ते आमच्या बालवर्गाच्या कमलताई शेवडेंनी!
साठ वर्षांपूर्वीची आमची, ताराबाई मोडकांची माँटेसरी शाळा एका बैठ्या, कौलारू घरात भरायची. तिथल्या ताई पालकांना प्रेमाने सल्ला देत,
“केदारला जास्तीचा डबा देत चला”, “लताचा एक फ्रॉक शाळेत ठेवा. ती झगा भिजवते.”
तसल्या बाळबोध सल्ल्यांमध्येच,
“तुमच्या अशोकला विज्ञानाची जात्याच आवड आहे. त्याच्या सगळ्या शंकांची व्यवस्थित उत्तरं द्या,”
असं कमलताईंनी अशोकच्या आईला सांगितलं. त्या बोलण्याचा वेगळेपणा तीन-चार वर्षांच्या आमच्या कानांना जाणवला आणि मनांनी टिपून ठेवला. जरा मोठं झाल्यावर त्याचा अर्थ कळला आणि त्यानंतर सतत अधिकाधिक पटत गेला. अशोकच्या आईने त्या सल्ल्यातल्या ‘स’वरून सायंटिस्ट ओळखला आणि निगुतीने घडवला. चौथीत असतानाच अशोकने अकरावीच्या विज्ञानाच्या पुस्तकांचा फडशा पाडला होता. पाचवीत इंग्रजीची ओळख झाली. आम्ही ‘मेरी पॉपिन्स’ वाचली, अशोकने ‘पॉप्युलर मेकॅनिक्स’ वाचलं. आमच्याकडे ‘रीडर्स डायजेस्ट’ यायला लागलं तर त्याच्याकडे ‘सायंटिफिक अमेरिकन’! आमच्या वेळच्या नॅशनल सायन्स टॅलेन्ट परीक्षेत अशोक भारतातून दुसरा आला!  

कानपूर आयआयटीहून MSc  करून तो कॅलिफोर्नियाच्या विश्वविख्यात बर्कली विद्यापिठात PhD करायला पोचला. विद्यापिठात विज्ञानाचा स्वर्ग होता. मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी मनमुराद प्रयोग करायला मुभा होती. संशोधनाची अक्षरशः चंगळ होती. पण अमेरिकेतली सुखवस्तू ‘गरिबी’ आणि भारतातलं भुकेकंगाल दारिद्र्य यांच्यातली प्रचंड तफावतही अशोकला तिथेच प्रकर्षाने जाणवली.  विज्ञानाचं वाण गोरगरिबांना लुटता आलं नाही तर ती कागदावरची लयलूट व्यर्थ ठरेल असं अशोकचं आणि अंजलीचं, त्याच्या पत्नीचं ठाम मत झालं.
त्याच ओढीने, अशोकच्या पीएचडीनंतर काही काळाने ती दोघं भारतात आली. ‘गॅस सिलिंडरसाठी रिश्वत देणार नाही,’ या बाण्यामुळे अंजलीने कित्येक महिने स्टोव्हचा धूर आणि घरघर सोसत, बिनतक्रार स्वयंपाक केला. पण सूर्यचुलींच्या संशोधनाच्या कामातही लाल फितीचे फटकारे बसले आणि गाडगीळ दांपत्याचा पुरता भ्रमनिरास झाला. पुन्हा चंबूगबाळं आवरून त्यांनी बर्कली गाठलं. त्यांच्या चंबूगबाळ्यात मायदेशातल्या उणिवांच्या प्रत्यक्ष अनुभवांची पुंजी होती आणि तरीही सोबत देशप्रेमाचं जड गाठोडंही होतं.

सुशिक्षित घरं

अमेरिकेत परतल्यावर नामांकित लॉरेन्स-बर्कली लॅबच्या Environmental Energy Technologies Divisionमध्ये डॉ.गाडगीळांची Staff Scientist म्हणून नेमणूक झाली.  बालपणापासूनच्या सखोल अभ्यासामुळे भौतिकशास्त्र हा डॉ.गाडगीळांचा जिवाभावाचा मित्र झाला होता. ते शास्त्र ज्यांच्यावर आधारलेलं आहे त्या पंचमहाभूतांबद्दल त्यांना व्यापक आपुलकी वाटत होती. त्यांनी आपल्या संशोधनाचा रोख पर्यावरणाची निगा, ऊर्जेची बचत वगैरे व्यावहारिक प्रश्नांकडे वळवला. बर्कलीतही ते अमेरिकन घरांतल्या वातावरणाचा,  त्याच्यातल्या रेडॉन या कर्कजनक विषारी तत्त्वाचा अभ्यास करून त्याच्यावर उपाय शोधत होते. घरांच्या बांधकामाच्या वेळेपासूनच त्यांच्यात काही खास यंत्रणा गुंफली तर घरातल्याच कॉम्प्यूटरांच्या मदतीने ती ‘स्मार्ट’ घरं विषारी रेडॉनला बाहेरच रोखतील आणि ‘गृहस्थां’च्या प्रकृतीची काळजी घेतील अशी डॉ.गाडगीळांनी अटकळ बांधली. आपल्या संशोधनाने त्यांनी अमेरिकेतल्या गगनचुंबी घरांसाठी तसे आणि इतरही अनेक सुसंस्कारांचे पाठ तयार केले आणि अजूनही करताहेत. त्याबाबतीतल्या महत्त्वाच्या निष्कर्षांसाठी त्यांचं बरंच कौतुक झालं. शिवाय काही काळ पॅरिसमध्ये काम करताना त्यांनी सौर-ऊर्जेच्या वापरासाठीही काही कॉम्प्यूटर प्रोग्रॅम्स लिहिले. त्यांचा जगभरातल्या कित्येक शास्त्रज्ञांनी लाभ उठवला.   

CFLजलाव, बिजली बचाव

ऊर्जेच्या काटकसरीचा भारताला कसा फायदा होईल ह्याचा विचार डॉक्टरांच्या डोक्यात चालूच होताच.
भारतात पेट्रोलपासून अन्नापर्यंत अनेक गोष्टींच्या किंमती त्यांच्या खऱ्या आंतरराष्ट्रीय किंमतीहून कितीतरी प्रमाणात कमी ठेवल्या जातात. भारतदेशाच्या एकंदर मिळकतीचा सुमारे १४% हिस्सा ती कृत्रिम स्वस्ताई निस्तरण्यात खर्ची पडतो.
वीज ही अशीच एक कृत्रिमरीत्या स्वस्त ठेवलेली आणि काही ठिकाणी फुकटच वाटलेली सुविधा आहे. इजिप्तच्या मुबारक-सरकारने लोकांना पाव फुकट वाटले. लोकांनी ते पाव टेबल पुसायला वापरले! फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत वाटत नाही. स्वस्त मिळणाऱ्या विजेची उधळपट्टी करण्यात लोकांना काहीच वावगं वाटत नाही. लग्नामुंजींना, सणांना गल्लीभर रोषणाई होते. मागणी वाढतच जाते. ते खुळे लाड पुरवले जातात. तोटा वाढतो.

पण त्याचमुळे वीज निर्माण करायला बांधावी लागणारी धरणं, विद्युत्‌-निर्मिती केंद्रं आणि तिथून ती वीज भारतासारख्या महाकाय देशात, घरोघरी पोचवायला उभारावी लागणारी अवाढव्य यंत्रणा यांच्यात योग्य ती सुधारणा करायला पैसा शिल्लक उरत नाही.  दुष्टचक्र चालू रहातं आणि वीजपुरवठ्याच्या यंत्रणेवर अनावश्यक ताण येतो. मग वीजकपात करावी लागते, आरडाओरडा होतो आणि नुकसान सोसून, भुर्दंड भरून आणि शिवाय कार्यक्षम यंत्रणा बांधूनही सरकारच्या माथी दोषाचं खापर फुटतंच. जनता असंतुष्टच रहाते.

डॉ.गाडगीळांनी त्या दुष्टचक्रावर तोडगा सुचवला. वीज स्वस्त न ठेवता CFLची नळकांडी स्वस्त करायचा सल्ला त्यांनी दिला. नेहमीच्या दिव्यांच्या बल्बऐवजी जर अधिक प्रभावी CFLची नळकांडी वापरली तर प्रत्येक दिवा एक पंचमांशच वीज वापरेल. पण घर मात्र पूर्वीइतक्याच प्रकाशाने उजळेल. शिवाय CFLचं आयुष्य साध्या बल्बच्या आठपट असल्यामुळे परिणामी तोही खर्च कमीच होईल. वीजदर वाढवले तरीही वीजबिल पूर्वीपेक्षा कमी होईल. नसतं औदार्य थांबवल्यामुळे सरकारचा खर्चही घटेल. सुधारणांसाठी पैसा उरेल. शिवाय विजेचा सार्वत्रिक वापर घटल्यामुळे ती अधिक पुरवठ्यालाही येईल. विद्युत्‌-केंद्रं, मैलोन्‌मैल पसरलेलं पुरवठ्याचं जाळं यांच्यावरचा ताण कमी होईल.

हे होतं डॉक्टरांनी कामानंतरची फुरसत खर्ची घालून केलेलं, कागदावरचं गणित. त्यांनी त्या गणिताचा प्रत्यक्ष व्यवहारातला प्रयोग मुंबईत करून बघायचं ठरवलं. पण त्यांनी अतिशय विचारपूर्वक आखलेल्या बेताची पुन्हा एकदा लाल फितीमुळे फरफट झाली आणि ती योजना बारगळली. त्यांनी मनात मांडलेलं गणित मनचा मांडाच ठरलं.

पण त्यांनी त्याच तत्त्वानुसार नव्या योजना आखल्या. पुढच्या सहा वर्षांत ब्राझील-मेक्सिकोसह एकूण आठ वेगवेगळ्या देशांत त्या राबवल्या. त्या आठही ठिकाणी घसघशीत यश मिळालं. ग्वाडेलूप या वसाहतीचे दिवे लावायला फ्रेंच सरकारला दर वर्षी २० कोटी डॉलर्सचा तोटा होत होता. CFLचे दीप उजळल्यापासून त्यांना नियमित नफाच व्हायला लागला. त्याशिवाय CFLदिव्यांनी कार्बनयुक्त प्रदूषणही घटलं. त्या आठही देशांच्या पर्यावरणाला त्याचा फायदा झाला. जागतिक संस्थांच्या अंदाजानुसार दोनहजार बारा साली त्या आठ देशांतल्या दहा कोटी घरांत मिळून २५०००कोटी रुपयांची बचत झाली आणि ती दरवर्षी वाढतच जाणार आहे.

जीवनदायी पाणपोई

सुट्टीसाठी भारतात आल्यावर डॉ.गाडगीळांच्या छोट्या मुलींना हटकून जुलाबांचा त्रास होई. त्यावेळी डॉक्टरांना भारतातल्या सगळ्या, विशेषतः गरीब मुलांची काळजी वाटे. अमेरिकेला परतल्यावरही तो विचार त्यांच्या मनात चालू राही.

त्यातच त्र्याण्णव साली भारतात, कलकत्त्यापासून मद्रासपर्यंत कॉलऱ्याने थैमान घातलं. तो नेहमीचा कॉलरा नव्हता. तो त्यावेळी अनोळखी असलेला, अत्यंत शक्तिमान, बेगुमान असा जहरी सैतान होता. एक लाखाहून अधिक माणसांना त्याने पछाडलं! पंधराशे बळी घेतले! हाहाकार माजला!

अनोळखी सैतानाची वाटही पोटातूनच, प्यायच्या पाण्यातून जाते. शुध्द पाणी प्याल्याने त्या वाटेची नाकाबंदी करणं शक्य असतं. क्लोरीनने किंवा उकळल्याने पाणी पिण्यालायक शुध्द होतं. पण भारतातल्या बहुसंख्य माणसांना आणि त्यांच्या सरकारलाही त्या दोन्ही पध्दती परवडत नाहीत. त्या माणसांना जंतुरहित पाणी पुरवायचं तर ते शुध्द करायची पध्दत अतिशय स्वस्त आणि प्रभावी असायला हवी. ती पध्दत शोधायच्या ध्यासाने डॉ.गाडगीळांना झपाटलं. रोजचं विद्यापिठाचं काम चालूच होतं. पण फावल्या वेळात, पदरमोड करून डॉक्टरांनी संशोधन सुरू केलं. संसाराचा भार तोलत अंजलीने त्यांना पूर्ण प्रोत्साहन दिलं.

त्या सुमाराला पाणी शुध्द करायला अल्ट्राव्हायोलेट किरणांचं तंत्र सर्रास वापरात आलं होतं. तेही प्रभावी होतं. पण त्याच्यासाठी पाणी नळातून येणारं किंवा पंपामुळे  ठराविक दाबाखाली वहाणारं असणं गरजेचं होतं. खेड्यापाड्यातल्या बहुसंख्य जनतेच्या बादल्या-कळशांतल्या पाण्याला ते वापरता येत नव्हतं. ते शक्य व्हावं म्हणून डॉ.गाडगीळ कामाला लागले.

कळशीतलं पाणी वहात नाही. पण अभिषेकाची धार वाहतीच असते. थोड्या उंचावरच्या भांड्यातून पाणी नळाने स्टीलच्या पसरट पन्हळात सोडलं आणि पन्हळातून वहात खालच्या टाकीत जाऊ दिलं तर केवळ गुरुत्वाकर्षणाच्या जोराने पन्हळातलं पाणी वहातं राहील. त्या उथळ प्रवाहावर पुरेसा प्रभावी अल्ट्राव्हायोलेट प्रकाशझोत टाकला तर प्रवाहातले हानिकारक जंतू मरतील आणि खालच्या टाकीत शुध्द पाणी जमा होईल. डॉक्टरांनी हेच तत्त्व वापरायचं ठरवलं. पण ती फावल्या वेळची कल्पना व्यवहारात आणायला पैसा आणि मनुष्यबळ लागणार होतं. त्याचं सोंग आणणं कठीण होतं.
सुदैवाने त्यांच्या CFLच्या कामाबद्दल त्यांना दीड लाख डॉलर रकमेची Pew Scholarship त्याच काळात मिळाली. ती रक्कम कुठल्याही संशोधनासाठी वापरायची त्यांना मुभा होती. डॉक्टरांची कळकळ जाणणाऱ्या मित्रांनीही थोडा हातभार लावला. शिवाय बर्कली विद्यापिठातले विद्यार्थी आणि इतरही संशोधक आपखुशीने विनावेतन काम करायला पुढे सरसावले. गाडगीळ-टीम जमली.
त्यांनी ट्यूबलाईटसारखी दिसणारी, फक्त चाळीस वॉटची, स्वस्त अल्ट्राव्हायोलेट वीजनळी वापरली. वीजपुरवठा नसला तर ती वीजनळी साध्या मोटारगाडीच्या बॅटरीवरही चालते. तिच्यावर धातूचे आरसे जोडून तिची सगळी शक्ती एका दिशेला एकवटली. त्या झोताखालच्या पसरट पन्हळातून पाणी वाहू दिलं. त्याच यंत्राची जरा झकपक दिसणारी बंदिस्त आवृत्ती म्हणजे Lawrence-Berkeley Labचं ‘UV Waterworks’(UVW).


कॉलऱ्याचे भरपूर जंतू असलेल्या गढूळ पाण्याचे पंधरा लिटर ‘UVW’ने एका मिनिटात शुध्द करता येतात. म्हणजेच ते दिवसाला वीस हजार लिटर शुध्द पाणी पुरवू शकतं.

गरिबांच्यासाठीच शोधलेलं ते जलशुध्दीकरणाचं तंत्र सरळ इंटरनेटवर सर्वांसाठी खुलं करायचा दीनबंधू डॉ.गाडगीळांचा मानस होता. पण विद्यापिठाच्या कायदेशीर सल्लागारांनी त्यांना थोपवलं आणि आंतरराष्ट्रीय पेटंट घ्यायचा सल्ला दिला.

पिण्यासाठी शुध्द पाण्याची गरज अनेक देशांतल्या लाखो गरिबांना होती. त्यांच्यापर्यंत UVW’चं तंत्रज्ञान पोचवण्यासाठी ते व्यवस्थित विकसित करून त्याचं एखाद्या कंपनीकडून घाऊक उत्पादन करून घेणं महत्त्वाचं होतं. त्या कंपनीला त्यांच्या गुंतवणुकीच्या परतफेडीची शाश्वती लाभणं आवश्यक होतं. तशी निश्चिंती अनेक वेगवेगळ्या देशांत मिळायला खास आंतरराष्ट्रीय पेटंटची गरज होती. 

म्हणून विद्यापिठाच्या लॉरेन्स बर्कली लॅबने तसं पेटंट घेतलं. ते अमेरिकेत आणि इतरही अनेक देशांमध्ये लागू होतं. डॉ.गाडगीळांच्या खास आग्रहास्तव फक्त भारताला त्याच्या निर्बंधांतून मुक्त ठेवलं गेलं. ते तंत्रज्ञान कंपन्यांना देऊ करताना ते मागासलेल्या देशांत रुजवायला हवं अशी अट घातली गेली. ती अट पूर्ण केल्यावरच ते तंत्र अमेरिकेत वापरायला त्यांना मुभा दिली.
Water Health International नावाच्या एका सेवाभावी कंपनीने ते कंत्राट घेतलं. तिला डॉ. गाडगीळांचं मार्गदर्शन मिळत राहिलं.

UVW’ मागास-देशांत पोचल्यावर एक नवीच अडचण आली. लोकांनी यंत्र बाजारातून खरेदी केलं, घरी नेऊन विजेच्या सॉकेटशी जोडलं अणि बटण दाबलं की काम सुरू होईल अशी साधी अपेक्षा होती. पण मागास-देशांतली स्थिती ‘चणे आहेत तर दात नाहीत’ अशी होती. तिथल्या कित्येक घरांत विजेचं सॉकेटच नव्हतं आणि सॉकेट असलंच तर वीज नव्हती. कंपनीचं दिवाळं निघायची वेळ आली!

एका अभिनव योजनेने ते संकट टळलं. यंत्रं घरोघरी न देता, ग्रामपंचायतींचा आर्थिक हातभार घेऊन कंपनीने गावागावातल्या पाणवठ्यांजवळ मोठी जलशुध्दीकेंद्रं उघडली आणि शुध्द पाणी गॅलनमधून माफक दराने विकलं. त्या पाणपोया गावाच्या उत्पन्नाचं साधन झाल्या. त्यानंतर ते यंत्र उत्तर भारतातल्या आणि इतर अनेक विकसनशील देशांतल्या खेड्यापाड्यांत राबवलं गेलं. विजेचा माफक वापर करणाऱ्या तशा एका यंत्राने एका रुपयात पंधरा लिटर पाणी शुध्द झालं आणि साधारण पन्नास-साठ रुपयांत एका माणसाच्या वर्षभराच्या पाण्याची सोय झाली. जिथे जिथे गरज होती तिथे तिथे प्रथम गाडगीळ-टीम त्या यंत्राचे सुटे भाग घेऊन पोचली. पहिलं यंत्र ज्या-त्या जागीच बनलं. स्थळकाळानुसार मूळ साच्यात सुधारणाही झाल्या. त्यामुळे ते यंत्र धूळ-वारा-पाऊस, खडबडीत रस्ते, धसमुसळे हात वगैरे अनंत अत्याचार सोसूनही टिकणारं असं, झुंजार बनलं. आता तीन महिन्यांतून एकदा देखभाल केलेलीही त्याला पुरते.

आता तशी पाचशे UVW Health Centres जगभरात आहेत. त्यांच्यातली सर्वाधिक केंद्रं भारतात आहेत. श्रीलंका, फिलिपीन्स, नायजेरिया, वगैरे देशांतही तशा पाणपोया आहेत. त्या वर्षभरात सुमारे पन्नास लाख गरिबांना निर्मळ पाणी पाजून त्यांची प्रकृती सांभाळतात आणि सहा ते पंधरा कोटी रुपयांची गंगाजळीही जमवतात.

२००४ सालच्या सुनामीत WHOने हप्त्याच्या बोलीवर तशा पाणपोया गावोगावी उघडल्या. तसल्या उत्पातांत एरवी वणव्यासारख्या पसरणाऱ्या साथी त्या गाडगीळ-पाण्यामुळे आटोक्यात राहिल्या.  मृत्यूचं ते तांडव टळलं. पाणपोया ‘जीवन’दायी ठरल्या.

UVWमुळे आफ्रिकेतल्या एड्सग्रस्त अनाथांचे पोटाचे विकार कमी झाले आणि त्यांचं तोकडं जिणं थोडं सुसह्य झालं.

डॉ.गाडगीळांनी विज्ञान आणि कल्पकता यांची सांगड घालून केलेल्या त्या जागतिक जनसेवेसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे Heinz  Award, European Patent Office’s Non-European Inventor Award, Zayed Future Energy Prize for Sustainable Energy यांच्यासारखे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. १९९६ साली, पर्यावरणावरच्या संशोधनासाठी दिलं जाणारं ‘Discover’पारितोषिकही मिळालं. अमेरिका हा संशोधकांचा देश. एकापेक्षा एक वरचढ अशा शेकडो शोधर्षींची तिथे मांदियाळी असते. त्यांच्यातल्या निवडक पस्तीस सर्वश्रेष्ठांमध्ये डॉ.गाडगीळांची गणना व्हायला लागली.
 
डॉ.गाडगीळांचं ध्यासपर्व चालूच राहिलं.

लोहाने गाळिले जळींचे जहर
बांगलादेशाच्या अनेक भागांतल्या ट्यूबवेलच्या पाण्यात आर्सेनिक हे विष मोठ्या प्रमाणात असतं. ते प्याल्याने त्वचेचे कॅन्सर, गॅन्ग्रीन, हृदयविकार होतात आणि अकाली मृत्यूचं प्रमाण वाढतं. तिथली प्रत्यक्ष पहाणी करायला डॉ.गाडगीळ गेले. तेव्हा तिथला एक तरुण शिक्षक त्यांच्यावर तुटूनच पडला,
“खिशात परतीचं तिकीट घेऊन आलेला तू! आमच्या दुर्दैवाचे दशावतार बघून अमेरिकेला निघून जाशील आणि आम्ही इथेच तडफडत, खितपत पडून राहू. आम्हालाच का भोगावं लागतंय हे?” तो तळतळाट डॉक्टरांच्या मनाला भिडला. त्या तरुणाचं नशीब बदलणं शक्य नव्हतं. पण विज्ञानाच्या मदतीने त्याच्या पाण्यातलं आर्सेनिक काढणं डॉक्टरांना जमलं असतं.  

त्यासाठी त्यांनी नव्या, सोप्या पध्दती शोधून काढल्या. गंजलेल्या लोखंडाची आर्सेनिकशी प्रक्रिया होऊन संयुग बनतं.  ती लोखंड-आर्सेनिक जोडगोळी जडावते. तिचा भांड्याच्या तळाला साका बसतो आणि लोखंड-आर्सेनिकशिवायचं वरचं निवळ पाणी सहज गाळून घेता येतं. डॉ.गाडगीळांनी त्यात नाशिकच्या विद्युत्‌निर्मितीकेंद्रातल्या बंबातळींची कोळशाची टाकाऊ राख वापरली. त्यांनी राखेच्या अतिसूक्ष्म कणांवर गंजाचा पातळ लेप दिला. चहाचा चमचाभर तशी ‘सगंज’ राख वापरून सहा माणसांच्या कुटुंबाची एका पूर्ण दिवसभराची आर्सेनिकविरहित पाण्याची सोय झाली.
दुसरी पध्दत त्याहूनही कार्यक्षम होती. गाडगीळ-टीमने लोखंडी इलेक्ट्रोड्स वापरून आर्सेनिकवाल्या विषारी पाण्यात वीज खेळवली. विजेच्या प्रभावामुळे थोडं लोखंड गंजून पाण्यात उतरलं आणि त्याचं आर्सेनिकबरोबर जड संयुग बनलं. त्याचा साका गाळून काढता आला. आता तसं बनवलेलं सोपं, स्वस्त यंत्र(ECAR) लाखो गरजूंपर्यंत पोचवायचं काम चालू आहे.

त्या शोधांसाठी डॉक्टरांना २०१३ साली तीन मोठे पुरस्कार मिळाले. Prince Sultaan bin Abdulaziz International Prize for Water हा त्यांच्यातला सर्वांत मोठा सन्मान. त्याखेरीज त्यांना Siemens Stiftung’s Empowering People Award आणि Reed Elsevier Environmental Challenge हेही मानमरातब मिळाले.

घरोघरी बर्कलीच्याच चुली

दारफूर हा पश्चिम सुदानमधला प्रदेश.  २००३ साली पश्चिम सुदानमध्ये राज्यकर्ते अरब आणि इतर सुदानी यांच्यात यादवी युध्द सुरू झालं. त्यात लाखो इतर सुदान्यांचं शिरकाण झालं. उरलेल्या सुमारे तीस लाखांना त्यांच्या घरांतून हुसकून छावण्यांत कोंबलं गेलं. त्या विस्थापितांना World Food Programकडून सुकं रेशन मिळत होतं. पण ते शिजवायला सरपण मात्र मिळत नव्हतं. एकेका छावणीत ऐंशी-नव्वद हजार विस्थापित कोंबलेले होते. त्यांनी सरपणासाठी छावणीच्या आसपासच्या जंगलातली झाडं तोडली. छावण्यांच्या आसपास सारं उजाड माळरान झालं. त्यामुळे छावणीतल्या बायकांना छावणीच्या निवाऱ्यातून बाहेर पडून सरपणासाठी सात-सात मैलांची पायपीट करावी लागली. त्यावेळी त्यांच्यावर हल्ले झाले, अनन्वित अत्याचार झाले.






ते सारं डॉ.गाडगीळांनी वर्तमानपत्रात वाचलं होतं. पण त्या राजकीय मामल्याशी त्यांना कर्तव्य नव्हतं.

२००४साली डॉ.गाडगीळांना एक फोन आला, “दारफूरच्या सुदानी बायकांना जेवण शिजवायला इंधनाची चणचण आहे. त्या सरपणासाठी दूरवर वणवणतात आणि अत्याचाराला बळी पडतात. निदान त्यांच्या घरचा ओला-सुका कचरा यंत्रात घट्ट दाबून त्याच्या लहानग्या वड्या करून द्याल का? बायका तेच इंधन म्हणून जाळतील. त्यांची परवड थांबेल.” प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण विचार करणाऱ्या डॉ.गाडगीळांनी त्या समस्येवर सहा महिने विचार केला. विज्ञानाने तोडगा निघेल हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी त्या कामात स्वतःला झोकून दिलं. त्यासाठी इतर अनेक कामं बाजूला सारली आणि दारफूरला जाऊन तिथल्या समस्येचा सांगोपांग अभ्यास केला. ते सोपं मुळीच नव्हतं. त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथल्या धुमश्चक्रीत घुसावं लागलं. आणि त्या जिवावरच्या धाडसासाठीही ऑक्सफॅम या आंतरराष्ट्रीय, सेवाभावी संस्थेकडे मिनतवारी करावी लागली.
दारफूरच्या बायका थोड्याशा अन्नाच्या बदल्यात छावणीतल्या दलालांकडून सरपण विकत घेत. त्यामुळे आधीच तुटपुंजं असलेलं रेशन अधिकच घटे. मग तीन दगडांच्या चुलीवर गोल बुडाच्या भांड्यात उकड-कोरड्यास शिजे. भांडं डुगडुगे, लवंडे.  भाजण्या-पोळण्याचे अपघात होत. चुलीतलं सरपण अर्धवटच जळल्यामुळे धूर होई. एकेका चुलीतून हजार-हजार सिगारेटींच्या इतका धूर निघे. धुराने डोळ्यांचे, फुप्फुसांचे आजार होत.

डॉक्टरांनी जिवावर उदार होऊन त्या छावण्यांतल्या बायकांचं खडतर जिणं, तिथला उकाडा, धूळ प्रत्यक्ष अनुभवलं. दुभाषांच्या मदतीने त्या बायकांशी संवाद साधून भरपूर माहिती गोळा केली. त्या बायकांना मिळणाऱ्या शिध्यात सालं-टरफलं-देठ वगैरे टाकाऊ भागच फारसा नसे. त्यामुळे त्यातून इंधनासाठी वड्या बनणं कठीण होतं. रोजच्या विस्तवासाठी कोळसा किंवा केरोसीन चोरून छावण्यांत पोचवणं अशक्य होतं. कमीत कमी सरपणात भागवणं हाच समस्येवरचा उपाय होता.


  
दारफूरी स्वयंपाकाला मोठ्या विस्तवाची गरज असे. त्याला मिणमिण्या सौर-चुली कामाच्या नव्हत्या. डॉ.गाडगीळांनी त्यांच्यासाठी ‘इंधन वाचवू-उष्णता वाढवू-प्रदूषण घटवू’ या तिहेरी उद्दिष्टाने नवीच चूल बनवली. तिच्यावर त्यांनी दारफूरी पध्दतीने रांधूनही पाहिलं! दारफूरकर गृहिणींना आवडेल अशा, स्वस्त, दणकट, कार्यक्षम आणि घाऊकपणे बनवायला सोयीच्या अशा त्या नव्या चुलीचं नाव Berkeley-Darfur Stove किंवा BDS.

BDSची रचना अशी आहे की तिच्यामध्ये वाऱ्याचा झोत येत नाही पण हवा खेळती रहाते आणि सरपण पूर्णपणे जळतं. त्यामुळे प्रदूषण तर टळतंच पण शिवाय सरपणातल्या जळाऊ भागाचं जास्तीत जास्त उष्णतेत रूपांतर होतं. ती उष्णता सभोवती निसटू न देता ती धरून ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात भांड्यापर्यंत पोचवायला म्हणून भांड्या(४)च्या बैठकीभोवती एक कठडा(३) केला आहे. तो भांड्याला विळखाही(१) घालतो. त्यामुळे उकड ढवळताना भांडं डुगडुगत नाही. चूल उचलायला सोपी जावी म्हणून तिला कानही(२)आहेत.


सरपणातली जास्तीत जास्त ऊर्जा सत्कारणी लागल्यामुळे सरपण तिपटीने अधिक पुरवठ्याला येतं. बायकांची आठवड्याची किमान अठरा तासांची पायपीट वाचते.

चूल तयार झाली. पण सगळ्या छावण्यांतल्या मिळून तीस लाख सुदान्यांना तशा चुली पोचवायच्या तर त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होणं आवश्यक होतं. ते त्या छावण्यांच्या दाटीवाटीत आणि राजकीय घुसमटीत जमणं शक्य नव्हतं. म्हणून गाडगीळ-टीमने BDSचे सुटे, सपाट भाग मुंबईतल्या कारखान्यात बनवून घेतले.

सध्या वर्षाला तशा पंधरा हजार चुली बनतात. मग चपट्या खोक्यात पॅक केलेले ते सपाट भाग बोटीने दारफूरला पाठवले जातात. दारफूरच्या छोट्या वर्कशॉपमध्ये विस्थापितांच्या छावणीतलेच बारा कसबी लोक ते सुटे भाग व्यवस्थित जुळवून त्यांच्या चुली बनवतात. इतक्या द्राविडी प्राणायामानंतरही एका चुलीची एकूण किंमत २० डॉलरच्या आसपास असते. तरीही, ऑक्सफॅमच्या आग्रहास्तव, दारफूरच्या आणीबाणीच्या काळात त्या चुली फुकटच दिल्या गेल्या.

त्यांच्यामुळे इंधनाची गरज चुलीमागे पाऊणपटीने घटली! दलालांकडची इंधन-खरेदी निम्म्याने घटली आणि सरपण गोळा करायला जाणंसुध्दा अर्ध्यावर आलं. प्रत्येक घरात वर्षाला अठरा हजार रुपयांचा इंधनखर्च वाचला. पाच वर्षं त्या चुली वापरल्यावर घरटी लाख रुपये वाचले! यंदाच्या जूनपर्यंत ३८००० चुली एकट्या दारफूरमध्येच वापरात आल्या. त्यांच्यामुळे धुराचं प्रदूषण, त्याने होणारे आजार आणि त्यांच्यावरचा खर्चही घटला. जंगलतोड कमी झाली. जंगलं वाचल्यामुळे झाडं-पशु-पक्षी वगैरेंच्या वैविध्याचीही पुढली हानी टळली.

रांधपाच्या धुरामुळे फुप्फुसांचे रोग होतात. त्या रोगांनी दरवर्षी, जगभरातली चाळीस लाख, म्हणजे एड्सच्या रोगाने जेवढी मरतात त्याच्या कितीतरी पटीने अधिक माणसं मृत्युमुखी पडतात. तीस लाख सुदान्यांना जशी BDSचुलीची गरज आहे तशीच गरज सरपणावर रांधणाऱ्या, जगभरातल्या इतर तीनशे कोटी लोकांनाही आहे. सरपण गोळा करताना अत्याचाराला बळी पडणाऱ्या बायकाही केवळ सुदानमध्येच नाहीत. BDSसारख्या इंधनबचावू चुली हा त्या साऱ्या पीडितांसाठी उःशाप आहे.
युनायटेड नेशन्स फाउंडेशनच्या मदतीने त्या चुली जगभर पुरवायच्या मोहिमेचं पहिलं पाऊल दारफूरमध्ये पडलं. २०२० सालापर्यंत जगभरातल्या दहा कोटी घरांमध्ये BDS चुली वापरात येतील असा अंदाज आहे. त्या चुली फुकट द्यायची आता गरजच राहिलेली नाही. दुबळ्या खिशांनाही परवडेल अशाच दरात त्या चुली लाखो गरिबांना विकून कंपनीला तोटा टाळता येईल. तशी योजना व्यवहारी असल्यामुळे ती स्थायी स्वरूपात चालू शकेल अशी अपेक्षा आहे.  
कार्यक्षम चुलींच्या त्या शोधासाठी डॉ.गाडगीळांना ‘Sustainability Pioneer Award’, Breakthrough Award वगैरे उच्च दर्जाची पारितोषिकं मिळाली.

शोधसिध्द हक्क

त्या सगळ्या उलाढालींतून डॉ.गाडगीळांना बौध्दिक मालमत्तेचं आणि पेटंटचं महत्त्व अधिक पटलं. ‘काव्य हे जसं सन्मानासाठी, मांगल्य जपण्यासाठी आहे तसंच ते पोटापाण्यासाठी आणि व्यवहार जाणण्यासाठीसुध्दा आहे’ असं आचार्य मम्मटांनी काव्यप्रकाशात म्हटलं आहे. त्याचप्रमाणे विज्ञान-संशोधनानेसुध्दा मानमरातब आणि लोककल्याण यांच्यासोबत व्यवहारही साधणं गरजेचं असतं हे डॉक्टरांच्या ध्यानात आलं.

जनताजनार्दनाच्या सेवेसाठीच केलेली‘UVW’, BDS, ECARसारखी बहुतेक संशोधनं सरकारी अनुदानाच्या पाठबळावर, मातब्बर विद्यापिठांत केली जातात. त्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन लाखो लोकांमध्ये प्रसार झाला की किंमत कमी ठेवूनही त्या शोधांपासून आर्थिक नफा होऊ शकतो.

कुठल्याही नव्या शोधाचं पेटंट घेतलं की ठराविक कालावधीसाठी ते संशोधन त्या शास्त्रज्ञाची बौध्दिक मालमत्ता(Intellectual Property) बनते. पेटंटमुळे त्या शास्त्रज्ञाला त्या संशोधनात खर्ची पडलेल्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला मिळवायची संधी मिळते. पुन्हा नव्या संशोधनासाठी बळ मिळतं आणि हुरूप येतो. इतकंच नव्हे तर तो शोध मागासलेल्या देशांतल्या गोरगरिबांपर्यंत पोचावा म्हणून अटीही घालता येतात.

पेटंटच्या, बौध्दिक मालमत्तेच्या तत्त्वांच्या मदतीने शास्त्रज्ञांना फायदा करून देतानाच तळागाळातल्या कोट्यवधी माणसांचंही भलं साधता येतं हे सिध्द करणारा एक शोधनिबंधही डॉ.गाडगीळांनी लिहिला. त्यासाठी त्यांनी आपल्याच दोन मोठ्या शोधांचे, जगभरातले अनुभव वापरले.

मार्ग माझा वेगळा

डॉ.गाडगीळांच्या संशोधनाचं उद्दिष्ट न्यूटन-आईनस्टाईनच्या संशोधनाहून वेगळं आहे. ते पुस्तकांतलं, प्रयोगशाळांतलं बंदिस्त ज्ञान नाही. ते लुई पाश्चरच्या कामासारखं लोकाभिमुख आहे. 

तळागाळातल्या लाखो माणसांना आधुनिक विज्ञानाचा फायदा करून द्यावा ह्यासाठी डॉ.गाडगीळ नवनव्या योजना आखतात. त्या योजनांना ते जिद्दीने व्यापक, व्यावहारिक, व्यावसायिक बनवतात; संशोधनाला स्थायी सेवेचं रूप देतात.

त्यांनी सतत पर्यावरणाची निगा राखली. पण त्यासाठी त्यांनी नारे देत निदर्शनं केली नाहीत. धूर ओकणाऱ्या चुली वापरू नयेत असं सांगणारी भाषणं ठोकली नाहीत. लाल फीत, तुटपुंजं भांडवल, राजकीय अस्थिरता यांसारख्या अडचणींच्या सबबी केल्या नाहीत. त्यांना भारतापासून दूर जावं लागलं. पण त्यांनी तिथूनही मायदेशातल्या रंजल्यागांजल्यांची दुःखं जाणून घेतली. 

जनताजनार्दनाचं रोजचं जगणं अधिक सुखाचं व्हावं, त्यांच्या घरांतलं वातावरण सुधारावं म्हणून संशोधन केलं. महत्त्वाचं म्हणजे त्यातलं बहुतेक काम त्यांनी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, ऑफिसच्या वेळाबाहेर, आपल्या फुरसतीच्या वेळातच केलं! पण तरीही त्याची गरिबांवर सक्ती केली नाही. गरिबांच्या कलाकलाने, त्यांना समजेल आणि रुचेल असं, चिमणीच्या दातांनी भरवत नवं तंत्रज्ञान त्यांच्या सेवेला हजर केलं. त्या अभिनव पध्दतीने डॉ.गाडगीळांनी पंचमहाभूतांना बुध्दिबळाने जिंकून घेतलं, गरिबांसाठी कामाला लावलं. एखाद्या छोट्या लोकवस्तीसाठी संशोधन करतानाही त्यांनी व्यापक दृष्टी बाळगली आणि त्याचा फायदा देऊन कोट्यवधी लोकांचं जिणं सुकर केलं. त्यामुळे अनायासे पर्यावरणाचीही काळजी घेणं सहज, सोपं झालं. ते तत्त्व त्यांनी शोधनिबंधांत मांडलं नाही. आपल्या आजवरच्या कामातून ते जगासमोर सिध्द करून दाखवलं.

National Academy of Engineering ही अमेरिकेच्या राष्ट्रपतींना वैज्ञानिक सल्ला देणारी समिती. तिचा सभासद होण्याचा सर्वोच्च सन्मान डॉ.गाडगीळांना २०१३साली मिळाला.  ते UNICEFसारख्या संस्थांचेही सल्लागार आहेत. अनेक देदीप्यमान सन्मान आणि पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. पण त्यांना आस आहे ती वेगळ्याच गोष्टीची!

कास विज्ञानाची, आस मानव्याची

शास्त्रज्ञांच्या नव्या पिढीने विज्ञानाला बहुजनसमाजाच्या सेवेत रुजू करावं; अधिकाधिक संशोधकांनी लाखो माणसांना प्रत्यक्ष भिडणाऱ्या पर्यावरणासाठी झटावं; अशी डॉ.गाडगीळांची इच्छा आहे. भारतात बरंच संशोधन चालतं. पण त्याला सामाजिक संदर्भ असतोच असं नाही. काही भारतीय शास्त्रज्ञांनी दलितांसाठी व्यापक काम केलं आहे. खेड्यांतले बालमृत्यू घटवायला डॉ.बंग पतिपत्नींनी सुइणींना ‘श्वासगणक’ वापरायला शिकवलं. डॉ.बंगांच्या शोधग्रामाचा प्रयोग गडचिरोलीत यशस्वी झाल्यावर भारताखेरीज इतर नऊ देशांतही त्या धर्तीवर काम झालं. पंडित रामचंद्र शर्मांनी बनवलेल्या आणि डॉ.सिंगनी प्रसिध्दी दिलेल्या जयपूर-फूटमुळे तीन लाखांहून अधिक अपंगांना हातातला भिकेचा कटोरा सोडून कामाला लागता आलं. MIT Tech Review, Ashoka Innovators for the Public यांच्यासारख्या उपक्रमांतूनही सामाजिक भान असलेले नवनवे संशोधक नजरेला आले.

पण भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने अद्याप अशा संशोधकांची संख्या नगण्य आहे म्हटलं तरी चालेल. कित्येक शास्त्रज्ञ अधिक धनलाभाच्या आशेने कॉम्प्यूटर गेम्ससारख्या श्रीमंत शोधांच्या मागे जातात. कधीकधी लाखो गरिबांना मदत करू शकेल असा उत्तम शोध केवळ योग्य ओळखीचा अभाव, लाल फीत, तुटपंजं भांडवल वगैरे अडसरांमुळे दुर्लक्षित रहातो. अडुसष्ठ सालापासून तयार असलेला जयपूर फूट पंच्याहत्तर सालापर्यंत अनुल्लेखितच राहिला. एक IAS ऑफिसर आणि एक मुख्यमंत्री या दोघांनी लक्ष घातल्यावरच त्याचं उत्पादन आणि वापर झपाट्याने वाढला.
जयपूर फूटच्या वार्षिक सात कोटीच्या उलाढालीतली अर्धी रक्कम तर भारत सरकारच्या सामाजिक न्यायखात्यातूनच येते. डॉ.गाडगीळांनी UVWaterworksसाठी खर्च केलेले दीड लाख डॉलर्स ही भारताच्या दृष्टिकोनातूनही फार मोठी रक्कम नव्हती. कागदावरचा वैज्ञानिक झगमगाट तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवणाऱ्या, ‘थोडक्यातून अधिकांसाठी अधिक’ साधणाऱ्या, सर्वसमावेशक उपक्रमांसाठी डॉ.माशेलकरांनी आव्हानच दिलं आहे. त्या आव्हानाला जागतिक बँकेचा पाठिंबाही आहे. समाजाचाच विचार करून लावलेला चपखल शोध अपार परिश्रमाने आणि पारदर्शक व्यवहाराने लोकांपर्यंत पोचवायचा ठरवला तर सरकारी आणि खाजगी पाठिंब्याने पुरेसा पैसा उभा करणं अशक्य नाही. सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता संशोधकांनी अडचणींतून नेमका व्यवहारी मार्ग हुडकला तर शोधाला व्यापक यश मिळू शकेल. प्रत्येक IITमधून तसे अनेक जनसेवी शोध लागतील.

भारताच्या नव्या पिढीतल्या शास्त्रज्ञांनी एकाहून एक सरस असे मानव्यधार्जिणे शोध लावले आणि त्यांच्या तुलनेत डॉ.गाडगीळांचं संशोधन खुजं भासायला लागलं तर सर्वात मोठा आनंद डॉ.गाडगीळांनाच होईल. त्यांच्या विज्ञानयज्ञासाठी त्यांना तेच पसायदान अपेक्षित आहे.

डॉ.उज्ज्वला दळवी.


‘अक्षर’ दिवाळी अंक २०१४







चांदरात

चांदरात

चांदरातीं या तू नि मी मिळुनियां
शुष्क माळावर या ये वसंत फुलवुया
गीत गात गगन झुलवुया  ॥

प्रीतबावरी एक आस अंतरीं
चांदण्यांच्याही पार जाऊ विहरू अंबरीं
करमेना भूवरी प्रिया  ॥

चिंब निथळत्या रातीं तू धुंद मनाला साथ दे
बावरता प्रीतसागरी तूच जिवाला हात दे
चंद्र साक्ष देतसे
प्रेम लाविते पिसे
खबर उद्याची नसे
तू नि मी कुठे, कसे

चांदरातीं या तू नि मी मिळुनियां
शुष्क माळावर या ये वसंत फुलवुया
गीत गात गगन झुलवुया  ॥

मन आनंदें हांसलें, मेघ बनुनि झेपावलें
नवथर नभ धरणीवरी नवरी नटुनी पातले
चंद्रपालखी सजे
तारांगण गजबजे
जग सारे कुजबुजे
गूज गोड हृदयीं जे

चांदरातीं या तू नि मी मिळुनियां
शुष्क माळावर या ये वसंत फुलवुया
गीत गात गगन झुलवुया  ॥



स्वच्छंद स्वप्नीं

स्वच्छंद स्वप्नीं


फैलावुनी पंख स्वप्नांत जाऊ, स्वच्छंद विहरू, चल तू
दाही दिशांना जिंकीत जाऊ, अनंती भरारू, चल तू ॥

ओवू विजेने निळी मेघमाला,
वाऱ्यासवे झिंगवूया वनाला,
गहिऱ्या धुक्यातून धुंडू स्वतांला,
तारा जिवांच्या जुळवून गाऊ, नवा सूर घुमवू, चल तू ॥

झुलू इंद्रधनुचा झोका करूनी,
ताऱ्यांस चुंबू नभाला भिडूनी,
पंखांत घेऊ क्षितिजे भरूनी,
भूतातली खंत विसरून जाऊ, नवा मोद मिरवू, चल तू ॥

फैलावुनी पंख स्वप्नांत जाऊ, स्वच्छंद विहरू, चल तू
संगे तुझ्या मी, माझ्यासवे तू, ये ना, कुठेही, चल तू ॥

काफला

काफला

कुठे चालला काफला जीवनाचा न ठावे तुला ना मला
भ्रमंतीत साऱ्या कधी ना सुटावा तुझा हात हातातला ॥
विजेसंगती वादळी चिंब न्हाऊ
समुद्रासवे गाज गंभीर गाऊ
प्रपातापरी अर्पुनी सर्व वेधू खरा अर्थ खोलातला ॥
शिकू गूढ तेजोलिपी चांदण्याची
रहस्ये तिच्यातून वाचू युगांची
सुटावी जयाने जगी सर्व कोडी जपू मंत्र ताऱ्यांतला॥